मित्रांनो तुमच्यापैकी अनेकांना पाठदुखीचा त्रास जाणवत असेल, पाठदुखीचा त्रास अगदी कुठल्याही वयात होऊ शकतो. बदलत्या जीवनशैली मुळे हा पाठदुखीचा त्रास अनेकांची पाठ सोडत नाहीये. त्यामुळे आम्ही ह्या लेखात तुमच्यासाठी काही उपाय घेऊन आलो आहोत ते करून पाठ दुखायची थांबेल कि नाही माहिती नाही पण पाठदुखीपासून आराम नक्कीच मिळेल.
१) नीट झोपा – पाठदुखी असलेल्या माणसांना नीट झोप लागत नाही. जेव्हा झोप अपुरी पडते तेव्हा पूर्ण दिवस तर बेकार जातोच पण पाठदुखी सुद्धा वाढते. अशा वेळेला झोपण्याच्या पद्धतीवर लक्ष देणे आवश्यक आहे. पाठदुखीचा त्रास असेल तर पाठीवर झोपणं शक्यतो टाळाच. एका बाजूला कडेने झोपा आणि दोन्ही पायांच्या मधे उशी ठेवा. झोपताना एका सरळ समान गादीवर झोपा.
२) शरीराची ठेवण सुधारा – ह्याचा अर्थ असा कि मान ताठ ठेवा आणि शरीर बांधणीच्या अनुकूल कार्य करा. बसताना योग्य स्थितीत बसा, वाकताना कंबरेतून हळू वाका आणि चालताना पाठ आणि छाती ताठ ठेऊन चाला. लॅपटॉप वर काम करताना मान सरळ ठेवा आणि खांदे रिलॅक्स ठेवा. ह्या लहान लहान गोष्टींवर लक्ष दिल्यास पाठदुखीच्या अनेक मोठ्या समस्यांना दूर ठेवता येते.
३) शारीरिक चिकित्सा – पाठदुखीसाठी शारीरिक चिकित्सा करून घ्या. त्यासाठी तुम्ही आपल्या नेहमीच्या डॉक्टर कडे जाऊ शकता. तिथला चिकित्सक तुमच्या शरीराचे परीक्षण करून पाठदुखीचे मूळ शोधून काढेल आणि त्याप्रमाणे योग्य तो व्यायाम आणि आहार तुम्हाला सुचवेल. ते करून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आम्ही काही व्यायाम आणि आहार ह्या लेखात सांगणार आहोत. ते ट्राय करून बघायला ही काही हरकत नाही.

४) अति आराम करू नका – पाठदुखी असलेल्या लोकांना डॉक्टर्स आराम करायला सांगतात. पण अति आराम झाल्यास पाठदुखी अजून बळावू शकते. २ दिवसापेक्षा जास्त बेड रेस्ट घेऊ नका. उठा आणि चालायला जा. थोड्या वेळ जॉगिंग करा आणि योगा करा. व्यायाम केल्याने पाठदुखी नेहमीपेक्षा लवकर बरी होते हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे.
५) बर्फ आणि गरम शेक – पाठदुखी होत असलेल्या जागेत काही दिवस बर्फाचा शेक द्या. एका कपड्यामध्ये बर्फ गुंडाळून पाठीला लावा. काही दिवसांनी रबरी पिशवीत गरम पाणी घेऊन त्याच ठिकाणी शेक द्या. त्यामुळे तिथल्या मांसपेशी रिलॅक्स होतील आणि रक्तप्रवाह सुरळीत होईल. त्या नंतर सर्वात चांगला उपाय म्हणजे मस्त गरम पाण्याने अंघोळ करा. शॉवर असेल तर उत्तम पण भांड्याने अंघोळ करत असल्यास पाठीवर वेदना होत असलेल्या ठिकाणी हळू हळू गरम पाणी सोडा. रोज हा उपाय केल्यास पाठदुखी जास्त दिवस टिकणार नाही.
६) मसाज – ह्या साठी तुम्हाला मसाज पार्लर मध्ये जायची गरज नाहीये. आपल्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला तुम्ही मसाज द्यायला सांगू शकता. पण त्यासाठी तुम्ही त्याला योग्य ते मार्गदर्शन केले पाहिजे नाहीतर तो कुठली तरी नस दाबून मोकळा व्हायचा आणि डबल काम व्हायचं. त्यामुळे त्याला तुमच्या वेदनांबद्दल पूर्ण माहिती द्या आणि तेलाने मालिश करा. मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि अंतर्गत आणि बाह्य हालचाल सुधारण्यास मदत मिळते.
७) स्मोकिंग करता? – स्मोकिंग करत असाल तर सोडून द्या. तुम्ही म्हणाल ह्याचा स्मोकिंग शी काय संबंध? अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिन मधे छापलेल्या एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे कि स्मोकिंग फक्त तुमचे लंग्सचं नाही तर पाठदुखी ला ही कारण ठरू शकते. तंबाखू मध्ये असलेल्या निकोटीन मुळे लहान रक्तपेशी पाठीतल्या सॉफ्ट टिश्यू पर्यंत पोहोचू देत नाहीत त्यामुळे तिथे रक्त पोचत नाही.
८) पोटाचे व्यायाम करा – पोटाचे व्यायाम म्हणजे तुम्हाला ६ पॅक्स बनवण्याची गरज नाही. बनवायचे असतील तर बनवू शकता. सांगायचा मुद्दा हा कि पोटाचे पण मसल्स असतात. त्यांना थोडं ट्रेन करा. पोटात पण ताकत येऊ द्या. पोटाला अवाढव्य बनवू नका. आपल्या कंबरेवरील शरीराचा लोड आपली पाठ घेत असते. थोडं प्रेशर घेण्यालायक आपल्या पोटालाही बनवा. पोटाला अजिबात वाईट वाटणार नाही उलट थँक यू म्हणेल. त्यामुळे पाठीवरचं प्रेशर ही निघून जाईल आणि लवकर बरी सुद्धा होईल.

व्यायाम कोणता कराल?
पाठदुखी असलेल्या लोकांना व्यायामाची गरज असते. पण सर्वच व्यायाम प्रकार त्यांच्यासाठी उपयुक्त नसतात. त्यांनी स्ट्रेचिंग चे व्यायामप्रकार सुचवले जातात ज्यामध्ये पोटाचे आणि पाठीचे मसल्स स्ट्रेच होतात.
१) अर्धे क्रन्चेस – हा पोटासाठी केला जाणारा व्यायामप्रकार आहे ज्यामध्ये पोट आणि पाठ स्ट्रेच होते. जमिनीवर पाय गुढघ्यातून वाकवून झोपा आणि दोन्ही हात छातीवर क्रॉस ठेऊन ३० डिग्री वरती उठण्याचा प्रयत्न करा आणि परत खाली जा. हे करताना कंबरेवर ताण आला नाही पाहिजे. ८-१० वेळा असे रोज करा.
२) वॉल सीट्स – भीतीला टेकून बसण्याचा हा व्यायामप्रकार आहे. १०-१२ इंच भीतीच्या समोर पाठ करून उभे रहा आणि भीतीला टेका. हळूहळू खाली सरका आणि बसण्याच्या पोझिशन मध्ये या. तुम्हाला कोणत्याही टेबल वर इथे बसायचे नाही हे लक्षात घ्या. १० मोजा आणि पुन्हा ह्या १० वेळा हा प्रकार करा. हे दोन व्यायाम प्रकार तुम्ही करू शकता. पण कोणताही व्यायाम प्रकार करताना एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा?
आहारात ऑलिव्ह ऑइल चा वापर करा तसेच दूध, तूप दह्या सारखे पदार्थ शरीरातलं कॅल्शिअम वाढवण्यात मदत करतात. तसेच आलं ही पाठदुखीमध्ये खूप गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच मासे, हळद, कॉफी, ड्राय फ्रुट्स, द्राक्षे ह्यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी पदार्थ असतात जे वेदनाशामक म्हणून काम करतात. तुम्हालाही पाठदुखी असेल तर वरील दिलेले उपाय ट्राय करून बघा आणि गरजूंना शेयर करा.