तुम्ही कितीही रोड ट्रिप करा किंवा विमान प्रवास करा पण रेल्वे प्रवासामध्ये जी मजा असते ती कशातच नाही. ज्याने रेल्वे चा प्रवास केला नाही असा माणूस शोधून पण सापडणार नाही. तुमच्या पैकी प्रत्येक जण लहानपणी किंवा आता सुध्दा उन्हाळ्यात मामा च्या गावाला जात असाल. आपल्या कोंकण रेल्वे ने पावसाळ्यात प्रवास करण्याची मज्जाच काहीतरी वेगळी आहे. पण आज आम्ही तुम्हाला ४ अश्या रेल्वे मार्गा बद्दल सांगणार आहोत ते वाचून तुम्हाला पण वाटेल, एकदा तरी ह्या पैकी एका मार्गा वर प्रवास करावाच. चला मग पाहुयात कोणते आहेत हे रेल्वे मार्ग!१) दार्जिलिंग हिमालयन रेल्वे – दार्जिलिंग हिमालयन रेल्वे हे ह्या ट्रेन चं नाव असून ही एक टॉय ट्रेन आहे. ही ट्रेन पश्चिम बंगाल मधल्या दार्जिलिंग ते न्यू जलपैगुरी च्या दरम्यान धावते. ह्या ट्रेन प्रवासाचं वैशिष्ट्य म्हणजे ही ट्रेन तुम्हाला फक्त पर्वत पठार नाही तर पूर्ण दार्जिलिंग चं सुंदर दर्शन ही घडवते. आज सुद्धा कोळश्यावर चालणारी ही ट्रेन १४ स्टेशन्स घेते. १८७९ मध्ये पहिल्यांदा धावलेली हे ट्रेन दार्जिलिंग चं मुख्य आकर्षण आहे. जर कधी दार्जिलिंग ला आलात तर ह्या ट्रेन ची सफर करायला विसरू नका.२) आयलँड एक्सप्रेस – कोच्ची च्या रेल्वे ट्रॅक वेळ धावणारी ही ट्रेन केरळातल्या हिरवळ पर्वत रांगा मधून प्रवास करते. डोळे दिपवून टाकणाऱ्या ह्या प्रवासामध्ये कोणताही बेट येत नाही. मग आयलँड एक्सप्रेस ह्या ट्रेन चा नाव कसं पडलं असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. १९७० च्या दशकात ही रेल्वे कोच्ची च्या वेलिंग्टन बंदराजवळ असलेल्या कोचीन बंदरा जवळ समाप्त व्हायची म्हणून ह्याचं नाव पडलं आयलँड एक्सप्रेस. आता ही रेल्वे बंगलोर ते कन्याकुमारी पर्यंत धावते.३) सी ब्रिज ट्रेन – केरळातल्या रामेश्वरम ह्या छोट्याश्या शहराशी पाबन बेटाला जोडण्यासाठी हा पूल बांधला गेला. १९१४ साली बांधलेला हा पूल २०१० पर्यंत देशातला सर्वात मोठा पूल मानला जायचा. आता देशातला सर्वात मोठा पूल मुंबईतला बांद्रा वरळी सी लिंक आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला अथांग पसरलेला समुद्र आणि एक छोटीशी रेल्वे लाईन अशा प्रकारे प्रवास करताना एक अद्भुत अनुभव येतो. ज्या लोकांना एका साहसी रेल्वे प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी नक्कीच ह्या ट्रेन मधून प्रवास करायला हरकत नाही.४) बारामुल्ला – बानिहाल डेमू ट्रेन – काझीगंद पासून बारामुल्ला पर्यंत धावणारी ही ट्रेन काश्मीर च्या दऱ्या खोऱ्यातून प्रवास करते. कश्मीर चा बर्फाच्छादित प्रदेश, पाईन वृक्षांची जंगले आणि सुंदर पर्वत रांगा पाहून कोणत्याही निसर्ग प्रेमी माणसाचे मन खुश होईल असा हा प्रवास आहे. त्याव्यतिरिक्त बनिहाल च्या बोगद्यातून प्रवास हा सुद्धा एक अविस्मरणीय अनुभव आहे कारण हा भारतातला सर्वात मोठा बोगदा असून तब्बल ११. २ किलोमीटर एवढा मोठा आहे. कश्मीर ला भेट देणार असाल तर ह्या ट्रेन मधून प्रवास करायला बिलकुल विसरू नका.