क्रिकेट जगात अनेक नवीन विक्रम बनत असतात ज्यामुळे आधीचे विक्रम मोडले जातात. मात्र क्रिकेट विश्वात आश्चर्यचकित करणारे असे अनेक योगायोग आहेत ज्यांच्यावर विश्वास ठेवणे सहजशक्य नाही. चला तर मग जाणून घेऊयात या योगायोगांबद्दल..
1. टेस्ट क्रिकेटमधील अजब गजब योगायोग

इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कुक याने 100 टेस्ट मॅचमध्ये एकूण 7955 रन्स आणि 25 शतक लगावली आहेत तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार असणाऱ्या मायकल क्लार्कने शंभर टेस्ट मॅचमध्ये 7966 रन्स बनवत 26 शतक झळकावली आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या आकड्यांची बेरीज केली तर दोन्ही खेळाडूंनी 200 मॅचमध्ये 15921 रन्स केले आहेत. यात 51 शतकांचा समावेश आहे. हे आकडे सचिन तेंडुलकरच्या टेस्ट करिअरचे आहेत. सचिनने त्याच्या टेस्ट कारकिर्दीत 200 सामने खेळत 15921 रन्स केले आहेत, त्यात 51 शतकांचा समावेश आहे.
2. भारताचा 153 रन्सने विजय

वनडे सामन्यांमध्ये भारताच्या रोहित शर्मा, वीरेंद्र सहवाग आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावर दुहेरी शतकांची नोंद आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्माने तर आजवर तीन वेळा हा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणार तो जगभरातील एकमेव फलंदाज आहे. टीम इंडियाच्या या तीन फलंदाजांनी केलेल्या दुहेरी शतकासोबत एक योगायोग जोडला गेला आहे. फलंदाजांनी वन डे सामन्यांमध्ये केलेल्या दुहेरी शतकांच्या खेळीने टीम इंडियाने धडाकेबाज विजय मिळवला आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या सामन्यात रोहितने 264, सेहवागने 219 आणि सचिनने नाबाद 200 धावांची खेळी केली. त्या तीनही मॅच भारताने 153 धावांनी जिंकल्या आहेत.
रोहित शर्मा :-

13 नोव्हेंबर 2014 रोजी कोलकाताच्या गार्डन मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय सामना रंगला होता. या सामन्यात भारताच्या रोहित शर्माने 264 धावांची रेकॉर्डब्रेक इनिंग खेळली. ईडन गार्डनवर आलेल्या या रोहित रुपी वादळामध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. रोहितच्या आवडत्या स्टेडियमपैकी ईडन गार्डन हे एक स्टेडियम आहे. त्यामुळे ईडन गार्डनवर खेळताना रोहितने 173 चेंडूंचा सामना करत 264 धावांचा पाऊस पाडला. आणि एक विश्व विक्रम आपल्या नावावर नोंद केला. या इनिंगमध्ये त्याने 33 चौकार आणि 9 षटकारांचा साज चढवला. रोहितच्या धमाकेदार इनिंगच्या जोरावर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये 5 फलंदाजांच्या मोबदल्यात 404 धावांचा डोंगर उभा केला. या डोंगराएवढ्या आव्हानाचा सामना करताना श्रीलंकेला 43.1 शतकात 251 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि टीम इंडियाने हा सामना 153 धावांनी जिंकला.
वीरेंद्र सेहवाग :-

तारीख होती 8 डिसेंबर 2011.. ठिकाण होते इंदोर येथील होळकर स्टेडियम आणि प्रतिस्पर्धी संघ होता वेस्टइंडीज.. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळणार नव्हता. आपल्या नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत संघाचा उपकर्णधार वीरेंद्र सेहवाग संघाचे प्रतिनिधित्व करत होता. या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मैदानात जाताच गोलंदाजांची धुलाई करण्याची सवय सेहवागला आधीपासूनच होती. या सामन्यातही त्याने त्याची पुनरावृत्ती केली. सलामीवीर गौतम गंभीरच्या साथीने जबरदस्त सुरुवात केली. सेहवागने 41 चेंडूंचा सामना करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर सेहवागने धावांची गती आणखीन वाढवली आणि पुढचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याने केवळ 28 चेंडूंचा सामना केला.
या खेळीत सेहवागने 10 चौकार आणि 5 षटकार लगावले. दुसऱ्या बाजूला उभा असणारा गौतम गंभीर 67 धावा करून बाद झाला. त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या सुरेश रैनाने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर फटका लगावण्याची सेहवागची सवय होती. त्यामुळे चेंडू हवेत गेल्यावर चाहते आपला श्वास रोखून सामना बघत असत. मात्र चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे जाऊन पडत असे.

वीरेंद्र सेहवागची खेळी पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. वीरू आपल्या अंदाजात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई करत होता. 150 धावांचा आकडा सेहवागने गाठण्यासाठी केवळ 112 चेंडूंचा सामना केला. यानंतरही त्याची चौफेर फटकेबाजी कमी झाली नाही. तो या पद्धतीने फटकेबाजी करत होता, ते पाहून सेहवागने दुहेरी शतक झळकावले अशी प्रत्येक चाहत्याची अपेक्षा होती. या अपेक्षेला साजेशी फलंदाजी करत सेहवागने अखेर 140 चेंडूंमध्ये दोनशे धावांचा पल्ला गाठला या खेळीत 23 चौकार आणि 6 षटकार ठोकले.
या सामन्यात सेहवागने 149 चेंडूमध्ये 25 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 219 धावांची शानदार खेळी केली. या खेळीच्या मदतीने टीम इंडियाने 418 धावांची विशाल धावसंख्या उभारली. याला प्रत्युत्तर देताना वेस्टइंडिजचा संघ 265 धावांवर ऑल आऊट झाला. याप्रकारे भारताने हा सामना 153 धावांनी जिंकला. या मोठ्या फरकाने मिळालेल्या विजयात वीरेंद्र सेहवागची कामगिरी उत्तम राहिली.
सचिन तेंडुलकर :-
24 फेब्रुवारी 2010 रोजी ग्वालियरच्या (मध्यप्रदेश) कॅप्टन रूपसिंह स्टेडियममध्ये हा सामना खेळला गेला. तीन सामन्यांच्या या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पहिले फलंदाजी करताना 50 षटकांत 3 विकेट्सच्या मोबदल्यात 401 धावांचे आव्हान ठेवले. या सामन्यात सचिनने 147 चेंडूत 25 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 200 धावा केल्या. याशिवाय या सामन्यात दिनेश कार्तिकने 79, युसूफ पठाणने 36 आणि धोनीने नाबाद 68 धावांचे योगदान दिले.

दक्षिण अफ्रीकेने या आव्हानाचा पाठलाग करताना 242 धावाच केल्या, यात एबी डिविलियर्सच्या नाबाद 114 धावांचा देखील समावेश होता. भारताकडून एस. श्रीसंतने सर्वाधिक तीन, रवींद्र जडेजा आणि यूसुफ पठानने दोन-दोन विकेट घेतल्या. सचिनच्या या यादगार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 153 धावांनी मोठा विजय मिळवला.
3. जन्म तारीख आणि टेस्ट क्रिकेटच्या धावांमध्ये समानता
इंग्लंडचे माजी विकेटकीपर आणि कप्तान एलेक स्टीवर्टची जन्म तारीख आणि त्याच्या टेस्ट मैच मध्ये केलेल्या धावांच्या संख्येत एक समानता आहे. त्याचा जन्म 8-4-63 रोजी झाला होता. इंग्लंडसाठी खेळताना त्यांनी 8463 धावा बनवल्या आहेत. हा एक मोठा योगायोगच म्हणावा लागेल.
4. 11 चा योगायोग
11-11-2011 रोजी दक्षिण अफ्रीका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टेस्ट मॅच सुरू होती. ही पहिली मॅच होती, या मॅचमध्ये आफ्रिकेला जिंकण्यासाठी 111 धावांची गरज होती. आश्चर्य म्हणजे यावेळी घड्याळात 11 वाजून 11 मिनिटे झाले होते. हि मालिका 1-1 ने ड्रॉ राहिली. यातील पहिली मॅचआफ्रिकेने तर दुसरी टेस्ट ऑस्ट्रेलियाने जिंकली होती.
5. 183 रन बनवा, भारताचे कॅप्टन बना
वन-डे क्रिकेटमध्ये भारताकडून ज्या खेळाडूने 183 धावांची खेळी केली. तो खेळाडू भारताचा कॅप्टन हमखास झाला आहे. यापेक्षा जास्त रन करणाऱ्या खेळाडूंना ही संधी मिळो अथवा ना मिळो. मात्र 183 धावांची खेळी करणाऱ्या खेळाडूला ही संधी नक्की मिळाली आहे. विश्वास बसत नसेल तर 183 धावांची खेळी करणाऱ्या आणि नंतर कॅप्टन बनलेल्या खेळाडूंची लिस्ट बघाच. सौरव गांगुली (183 रन विरूद्ध श्रीलंका, 1999) 183 रन बनवल्यानंतर कॅप्टन बनवण्याच्या या योगायोगाची सुरुवात सौरव गांगुलीने केली होती. गांगुलीने 1999 विश्वचषकातील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 183 धावांची खेळी केली होती यावेळी भारताचे कर्णधार मोहम्मद अजहरुद्दिन हे होते.

ही खेळी केल्याच्या काही दिवसानंतर गांगुलीला टीमचा कर्णधार करण्यात आले. या पद्धतीने त्याने टीम इंडियाची कमान सांभाळली गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम मॅच फिक्सिंगच्या कचाट्यातून बाहेर पडून टॉप टीम बनण्याचा प्रवास करत होती. महेन्द्र सिंह धोनी (183* रन विरुद्ध श्रीलंका 2005) दुसरा खेळाडू आहे महेंद्र सिंग धोनी ज्याने 183 धावा केल्यानंतर तो भारताचा कॅप्टन झाला होता. धोनीने श्रीलंकेच्या विरूद्ध जयपुर येथे 183 धावांचिल खेळी केली. या खेळी सोबत त्याने आपले दुसरे शकत साजरे केले. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुली होता. या खेळीच्या साधारण 2 वर्षातच धोनी संघाचा कर्णधार झाला. त्यानंतर धोनीने मागे वळून पाहिलेच नाही आणि टी20 विश्वचषक 2007, त्यानंतर विश्वचषक 2011 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी सारखे कीताब जिंकून भारताला जगातील सर्वश्रेष्ठ टीम बनवले.
विराट कोहली (183 रन विरुद्ध पाकिस्तान 2012) विराट कोहली ने 183 रनांची परंपरा पुढे नेली. युवा विराट कोहलीने 2012 एशिया कपमध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध 183 रनांची खेळी केली. यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार धोनी होता. मात्र काही सामन्यांमध्ये धोनीच्या अनुपस्थितीत विराटने कॅप्टन्सी केली होती.असे असले तरी ही खेळी केल्याच्या 2 वर्षानंतर कोहली टेस्ट टीमचा कर्णधार बनला. त्यानंतर 2017 साली ज्यावेळी धोनीने वनडेची कॅप्टन्सी सोडली तेव्हापासून कोहली भारताच्या कर्णधारपदाची भूमिका सांभाळत आहे.