मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक जणांचं स्वतःच घर असेल आणि लवकरच नवीन घरात जाणार आहात किंवा नवीन घर भाड्याने देणार आहात तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. तुमच्यापैकी अनेक जणांनी गुंतवणूक म्हणून घर घेतलं असेल आणि घर भाड्याने देणार आहात तर काही गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे जेणेकरून तुमचा व्यवहार कायदेशीर आणि सुरक्षित होईल. घरासाठी योग्य भाडे ठरवणे जसे महत्वाचे असते तसेच घरासाठी योग्य भाडेकरू ठेवणेही खूप आवश्यक असते. ह्या साठी कोणत्या गोष्टींची काळजी आपण घेऊ शकतो हे ह्या लेखात आपण वाचणार आहोत.

१) भाडेकरूचे व्हेरिफिकेशन – सर्वात पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे भाडेकरूला जाणून घेणे. त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याच्याकडील ओळखपत्रे तपासावीत. त्यामध्ये त्याचा कायम पत्ता, पॅन कार्ड, कंपनी आयडी, शेवटच्या ३ महिन्यांचे बँक स्टेटमेंट तपासावेत. जर तुम्ही ह्या सर्व गोष्टींची पडताळणी न करता आपले घर भाड्याने दिलेत तर नंतर प्रॉब्लेम येऊ शकतात. कंपनी आयडी आणि शेवटच्या ३ महिन्यांचे बँक स्टेटमेंट तपासल्याने भाडेकरू भाडे देऊ शकणार कि नाही ह्याची तुम्हाला खात्री होईल. भाडेकरूची पडताळणी झाली आणि सर्व काही व्यवस्थित असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता.

२) अग्रीमेंट तयार करा – पडताळणी पूर्ण झाल्या नंतर घर भाडेतत्वावर देण्यासाठी त्यासाठीचे अग्रीमेंट तयार करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला १०० ररुपये मूल्य असलेला स्टॅम्प पेपर विकत घ्यावा लागेल. ह्या अग्रीमेंट मध्ये काही महत्वाच्या गोष्टी नमूद कराव्या लागतात. त्यामध्ये तुमच्या सोसायटी चे नियम आणि अटी, भाडे आणि ईतर बिल्स भरण्याची तारीख, घराच्या भाड्याची किंमत, सोसायटीचा देखभाल खर्च म्हणजेच मेंटेनन्स चार्जेस, भाडे वाढण्याची तारीख, कराराचे नूतनीकरण, नोटीस पिरेड इत्यादी गोष्टी नमूद कराव्या लागतात.

३) भाड्याच्या किंमतीची स्पष्ट माहिती द्या – अग्रीमेंट मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे भाडे किती आहे ते भाडेकरूला स्पष्ट करून सांगा आणि नीट अक्षरात कोणतीही चूक न करता अग्रीमेंट मध्ये नमूद करा. तसेच कालांतराने भाडे कसे वाढवले जाईल ही गोष्ट ही त्याला समजावून सांगा आणि तेच भाडेकरारावरही नमूद करा. म्हणजे भाडेकरू नंतर असे काही ठरलेच नव्हते म्हणून विरोध करणार नाही.

४) अग्रीमेंट रजिस्टर करा – सामान्यपणे ९ महिन्यांच्या करारामध्ये घराचा मालक आणि भाडेकरू फक्त अग्रीमेंट वर सही करतात. आणि जर एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी भाडेतत्वावर द्यायची असेल तर अग्रीमेंट रजिस्टर करणे अनिवार्य आहे. असे असले तरी प्रत्येक अग्रीमेंट रजिस्टर करणे फायद्याचे ठरते कारण भाडेकरू आणि घर मालकामध्ये भविष्यात खटला चालू झाला तर हाच एक पुरावा ग्राह्य धरला जातो. रजिस्टर करण्यासाठी रजिस्ट्रेशन फी आणि स्टॅम्प ड्युटी भरावी लागते.

५) पोलीस पडताळणी – सर्वात महत्वाची पायरी म्हणजे पोलीस पडताळणी. ह्या साठी भाडेकरूला तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जायची गरज नाही. हे न केल्यास आय पी सी सेक्शन १८८ अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. ह्यास साठी तुम्हाला फक्त इतकेच करायचे आहे कि भाडेकरूचे आधार आणि पॅन कार्ड घेऊन पोलीस स्टेशन मध्ये जायचे आणि पोलीस एक फॉर्म देतील तो भरायचा. असे केल्यास भाडेकरूवर काही गुन्हा दाखल आहे का ह्याची माहिती मिळते.हे सर्व झाल्यानंतर तुम्ही तुमचे घर भाड्याने द्यायला मोकळे आहात. असे असून सुद्धा तुम्ही मधल्या मध्ये घर बघायला जाऊ शकता. भाडेकरू तुम्ही न सांगितलेल्या नियमांचे उल्लंघन करत असेल तर तुम्ही कायदेशीररित्या करार मोडून भाडेकरूला बाहेर कडू शकता. जर भाडेकरूने ह्या साठी विरोध केल्यास तुम्ही घरभाड्यांशी संबंधित विवादांवर निर्णय देणाऱ्या अधिकृत संस्थेकडे तक्रार करू शकता. शक्यतो घर भाड्याने देताना कुटुंबाला द्या. एकटा दुकटा माणूस राहायला येणार असेल तर सर्व गोष्टींची नीट पडताळणी करा. तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करणे शक्य नसेल तर तुम्ही एका विश्वासू एजन्ट कडून पण करवून घेऊ शकता. लेख आवडला असेल तर नक्की शेयर करा.