भारतीय धडाकेबाज क्रिकेटपटू पंतच्या कारला भीषण अपघात, गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल. ऋषभ पंत दिल्लीहून घरी जात असताना हा भीषण अपघात झाला. ऋषभची कार रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथील एका वळणावर रेलिंगला धडकली. कार नारसन गावात आली असता कारचालकाचं गाडीवरील ताबा सुटला आणि रेलिंग तसेच खांबांना धडक देत कार पलटी झाली. ही धडक अत्यंत जोरदार होती.

त्यामुळे कारला भीषण आग लागली. त्यामुळे बघता बघता कार जळून खाक झाली. या कारचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला. त्यामुळे हा अपघात किती भीषण होता हे दिसून येतं. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात आली.

या भीषण अपघातीच माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि खानपुरचे आमदार उमेश कुमार हेदेखील रुग्णालयात पोहचले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.

या अपघातात ऋषभ पंतला मोठा मार लागला आहे. त्याच्या कपाळावर जबर मार लागला आहे. शिवाय ऋषभच्या पाय आणि पाठीलाही भीषण मार लागला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभला दिल्ली रोड येथील सक्षम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

दिल्लीहून घरी येत असताना भरधाव वेगात असणाऱ्या पंतच्या या स्पोर्ट्स कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पंतवर देहरादूनमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. मात्र पंतचा अपघात झाल्याची माहिती समोर येताच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना त्याच्या उपचारासंदर्भात विशेष निर्देश दिले आहेत.

अपघातस्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, ऋषभची कार रेलिंगला धडकली, ज्यानंतर कारने पेट घेतला. मोठ्या प्रयत्नानंतर कारची आग विझवण्यात यश आलं.ऋषभची प्रकृती स्थिर असल्याचं सक्षम रुग्णालयाचे चेअरमन डॉय सुशील नागर यांनी सांगितलं. त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.