सुबोध भावे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अग्रगण्य नाव.. एक उत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून त्याने स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजवर सुबोधने साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी फक्त पसंतीच दिली नाही तर अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्याच्या अभिनयातले बारकावे, एखाद्या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याची वृत्ती बरंच काही सांगून जाते. गेल्या अनेक वर्षांपासूनचा सुबोधचा चित्रपटसृष्टीतील अनुभव त्याच्या अभिनयातून नेहमीच झळकत असतो. प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याची त्याच्यातील कला अनेक नवोदित कलाकारांना प्रेरणा देणारीच ठरते.

केवळ सिनेमातूनच नाही तर छोट्या आणि मोठ्या पडदयांवर आपली छाप सोडलेले, आपली वेगळी अशी ओळख निर्माण केलेले अनेक कलाकार या चित्रपटसृष्टीत आहेत. मात्र सुबोधने प्रेक्षकांच्या मनात अभिनयातून स्वतःची तयार केलेली प्रतिमा काही औरच आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सुबोध भावे यांचे नाव घेतले जाते. लोकमान्य, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली, मी काशिनाथ घाणेकर ह्यासारख्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका तर खरंच कौतुकास्पद होत्या. त्याच्या या चित्रपटांतील भूमिकांना इतर दुसरं कोणीही त्याच्याइतका न्याय दिला असता याची शक्यता कमीच वाटते. छोट्या पडद्यावरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेने अल्पावधीतच मिळविलेली लोकप्रियता त्याच्या अभिनयाचं यश म्हणावं लागेल.अभिनयाच्या क्षेत्रात सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या सुबोधने देखील कुणाचं तरी मन जिंकण्यासाठी प्रयत्न केले होते. अशी एक व्यक्ती होती की तिला पाहताक्षणीच तो तिच्या प्रेमात पडला होता. आज आम्ही तुम्हाला सुबोधच्या लव्हस्टोरीबद्दल सांगणार आहोत, अगदी फिल्मी अशी ही प्रेमकहाणी.

मंजिरी.. हिच ती व्यक्ती ज्या व्यक्तीला पहिल्यांदा पाहिल्यावरच सुबोध तिच्या प्रेमात पडला. सुबोध आणि मंजिरी ह्यांची पहिली भेट नाट्यसंस्कार कला अकॅडमीमध्ये झाली. सुबोधला बालपणापासूनच अभिनय करण्याची आवड होती. परंतु सुबोधला चांगला अभिनय येत नसल्यामुळे त्याला नाटकांमध्ये घेतले नव्हते. त्यामुळे तो बॅकस्टेज काम करत होता. त्याचप्रमाणे मंजिरीला सुद्धा थोडीफार अभिनयाची आवड होती.मंजिरी त्यावेळी नाटकात काम करायची. सुबोधला सुद्धा अभिनयाची फार आवड होती, मात्र चांगला अभिनय येत नसल्यामुळे त्याला नाटकात काम मिळत नव्हते. तो बॅकस्टेज काम करत होता आणि मंजिरी नाटकात.. याच दरम्यान सुबोधने मंजिरीला पाहिले आणि पाहताक्षणी तो तिच्या प्रेमात पडला. त्यावेळी मंजिरी शाळेत आठवीत शिकत होती. तर सुबोध दहावीत होता. त्याने नाटकांत काम करताना पाहिल तेव्हा तिला पाहताक्षणीच तो तिच्या प्रेमात पडला. सुबोध म्हणजे खूप बोलका, मनमिळावू स्वभाव यांमुळे तो मंजिराला आवडला होता. हिच त्यांच्या प्रेमाची सुरुवात होती.

दोघांचीही शाळा वेगवेगळी असल्यामुळे भेट होणं जवळपास अशक्यच त्यामुळे मंजिरीला पाहण्यासाठी मित्रांसोबत चौकात उभं राहणं देखील सुबोधने मनापासून अनुभवलं आहे. त्यानंतर ती शाळेतून येता जाता दोघांमध्ये नजरानजर होणे हे नित्याचेच झाले आणि त्यांच्यात जवळीक वाढली. पण ते म्हणतात ना प्रेमात नेहमी कोणीतरी तिसरं येतं तसंच काहीसं यांच्या बाबतीत देखील घडत होता. मंजिरीच्या मैत्रिणीला सुबोध फारसा आवडत नव्हता. त्यामुळे तिने सुबोधपासून मंजिरीला लांब राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र मंजिरीला सुबोधबद्दल प्रचंड विश्वास होता.सुबोधला मंजिरी खरंच मनापासून खूप आवडत होती, त्याने त्याचे प्रेम अनेकदा व्यक्त देखील केले. सुबोधने मंजिरीला आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी ऑटोग्राफ बुकवर एक छानसं पत्र लिहिले. त्या पत्राच्या शेवटी स्वतःची स्वाक्षरी सुद्धा केली. सुबोधने मंजिरीला लिहिलेल्या त्या पत्रात लिहिलं होतं, ‘शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आय लव्ह यु, व्हॉट इज माय फॉल्ट’. सुबोधने हातात दिलेले हे पत्र पाहून मंजिरीने थोडा भाव खायचा ठरवला आणि सुबोधकडे तिने थोडा वेळ मागितला. जर का मी ह्या ठराविक दिवशी, ठराविक वेळी बालगंधर्वाच्या पुलावर आले, तर तू समजून जा कि माझे सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे. तिचे हे बोलणे ऐकून सुबोधच्या मनात संभ्रम निर्माण झाला.

मंजिरीला आपले प्रेम मान्य असेल का? ती आपल्या प्रेमाचा स्वीकार करेल का? असे अनेक प्रश्न सुबोधच्या मनात निर्माण झाले. आणि अखेर तो दिवस उजाडला, मंजिरी स्वतःहून ठरल्याप्रमाणे हजर झाली. सुबोधने मंजिरी पुलाजवळ आलेली पाहताच तो तिच्या जवळ गेला, त्या क्षणापासूनच मंजिरी- सुबोधची प्रेमकहाणी सुरू झाली. लहान वयात प्रेमात पडल्यामुळे घरच्यांची भीती होतीच, याशिवाय भेटणं देखील खूप कठीण होतं होतं. त्यामुळे सुरुवातीला ते वेगवेगळ्या नाटकांच्या ग्रुप मध्ये, किंवा मग एखाद्या मित्रमैत्रिणीच्या वाढदिवसामध्ये भेटायचे. मंजिरीची दहावी झाल्यानंतर ते पहिल्यांदा एकांतात भेटले. मंजिरीची बारावी झाल्यानंतर अचानक तिच्या कुटुंबाने कॅनडा मध्ये शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. मात्र याआधीच दोघांनीही आपापल्या घरी त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितले होते. त्यावेळी घरच्यांनी स्पष्ट शब्दांत त्यांना शिक्षण आणि करियरकडे संपूर्ण लक्ष देण्याचा सल्ला दिला.दोघांनीही तुमचे शिक्षण पूर्ण करा, त्यानंतर तुमचे करिअर बघा आणि त्यानंतरच प्रेमात पडा, तुम्ही प्रेम करण्यासाठी खूपच लहान आहात, अशी घरच्यांची भूमिका होती. त्यानंतर मंजिरी कॅनडाला निघून गेली. त्याला तिचे जाणे आवडले नव्हते, मात्र त्याच्या हातात काहीही नव्हते. मंजिरी कॅनडाला गेली असली तरी ती त्याला अजिबात विसरली नव्हती, दोघे एकमेकांशी पत्रव्यवहार करत होते. एकमेकांपासून लांब गेल्यामुळे दोघेही एकमेकांना काही वर्षातच विसरून जातील घरच्यांना असे वाटले होते. परंतु प्रत्यक्षात असं घडलं नाही, ते एकमेकांपासून खूप लांब असले तरी मनाने आणि हृदयाने एकमेकांच्या खूप जवळ होते. दोघांचा एकमेकांप्रति असलेला विश्वास त्यांच्या प्रेमाची साथ देत होता. त्यामुळेच इतक्या वर्षानंतरही दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते.

मंजिरीने कॅनडामधून इंजिनिअरिंग पूर्ण केले आणि ती तब्बल पाच वर्षांनी भारतात परतली. भारतात आल्यावर एकमेकांना भेटून दोघांनीही एकाच कंपनीत नोकरी करण्याचे ठरवले. त्यानुसार दोघांनीही पुण्यात एकत्र नोकरी केली. सुबोध मार्केटिंग क्षेत्रात काम करत होता. नोकरी करत असताना तो नाटकातही काम करत होता. काही दिवसांतच दोघांनीही आपल्या प्रेमाबद्दल घरच्यांना सांगितले, घरच्यांनाही त्यांच्या इतक्या वर्षांच्या प्रेमाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सुद्धा होकार दर्शवला. १२ जुलै २००१ रोजी सुबोध आणि मंजिरी विवाहबंधनात अडकले. सुबोध आणि मंजिरी ह्यांना दोन मुले, मल्हार आणि कान्हा असून आता दोघांच्या लग्नाला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मंजिरी पाठीशी असल्यामुळेच मी हा आजवरचा प्रवास करू शकलो असं सुबोध आवर्जून सांगतो. ‘लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप’ चा नेमका अर्थ या दोघांच्या नात्याकडे पाहिल्यावर खऱ्या अर्थाने समजतो. सुबोध आणि मंजिरी ह्यांना भावी आयुष्यासाठी आमच्या टिमकडून मनापासून शुभेच्छा.