आपण गंमत म्हणून एकमेकांना गुदगुल्या करतो. एखादा लहान मुलाला हसवायचे असल्यास आपण त्याला गुदगुल्या करतो. आज-काल व्हिडिओ च्या जमान्यात अनेक लहान मुलांना गुदगुल्या करून हसवण्याचे व्हिडीओ व्हाट्सअप फेसबूक युट्युब वर असतात ते पाहून आपण हसतो. मराठी मध्ये ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ अशी म्हण आहे. जेव्हा आपल्याला कोणी गुदगुल्या करतं तेव्हा आपण पण जोरात हसतो मात्र काहीवेळा गुदगुल्या अती झाल्यास आपण समोरील व्यक्तीवर राग व्यक्तही करतो. लहान मुलांना अति गुदगुल्या केल्यास ते रडतात.

गंमत म्हणजे ज्या गुदगुल्यांनी आपण इतरांना हसवतो परंतु आपण स्वतः स्वतःला गुदगुल्या करू शकत नाही. हे तुम्ही देखील अनुभवले असाल, असे का होते? याचा शोध बर्लिनमधील हुमबोल्ड विद्यापीठातील संशोधकांनी घेतला. गुदगुल्या केल्यानंतरच्या प्रतिक्रिया या मेंदूतील विशिष्ट भागात होणाऱ्या बदलांमुळे होत असतात. दुसऱ्याने स्पर्श केल्यानंतरच ही प्रतिक्षिप्त क्रिया घडते, असे संशोधकांना आढळून आले.
बर्लिनमधील संशोधकांनी उंदरांवर प्रयोग केले. मानवाच्या मेंदूची रचना आणि उंदराच्या मेंदूच्या रचनेत बरेच साम्य आहे. माणसाला गुदगुल्या केल्यानंतर जशी प्रतिक्रिया मिळते, तशीच प्रतिक्रिया उंदरांना गुदगुल्या केल्यानंतर संशोधकांना मिळाली. शरीराला दुसऱ्याने स्पर्श केल्याचा संदेश मेंदूतील ‘सोमॅटसेन्ससी सिस्टिम’पर्यंत पोहोचतो व प्रतिक्रिया दिली जाते.

उंदरांना जेव्हा गुदगुल्या केल्या गेल्या तेव्हा हीच प्रक्रिया झाली व उंदरांनीही प्रतिक्रिया दिली व आवाजही काढला. स्वतःच्या स्पर्शाने शरीर तीव्र प्रतिक्रिया देत नाही. गुदगुदगुल्यांच्या बाबतीत हीच गोष्ट लागू होते. स्वतःच्या स्पर्शाची सवय असते, त्यामुळे मेंदूकडून तीव्र प्रतिक्रियेचा संदेश दिला जात नाही. स्वतःच्या स्पर्शाने कोणतेही नुकसान होणार नाही, याची जाणीव मेंदूला असते, असे मत ह्युमरकेअर इन्स्टिट्यूटमधील संशोधक मिशेल तित्से यांनी व्यक्त केले.
गुदगुल्या केल्यानंतर नेमके होते काय याचे वर्णन ‘नेरफेनकित्सेल’ या शब्दाने केले जाते. याचा अर्थ थोडी भीती आणि थोडा रोमांच असा होतो. गुदगुल्या केल्यानंतर मेंदूमध्ये थोडा आनंद आणि हवीहवीशी किंचित वेदना निर्माण होते. त्याचा ताण मेंदूवर येतो आणि अनियंत्रित हास्याच्या रूपाने तो बाहेर पडतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. गुदगुल्या काही प्रमाणात हव्याहव्याशा वाटतात; पण त्याची मर्यादा ओलांडली की त्रासही होतो. उंदरांच्या बाबतीत हीच क्रिया घडते, असे संशोधकांना आढळून आले.

शरारातील ज्या भागात जास्त न्यूरॉन असतात (उदा. पोट, काखा, जांघा, तळवा) तो भाग गुदगुल्यांच्या दृष्टीने जास्त संवेदनशील असतो. गुदगुल्या आपल्या शरीराला हानी पोहोचवणार नाहीत, असे जेव्हा शरीराला वाटते, तेव्हा मेंदूवरील तणाव हास्याच्या रूपाने बाहेर येतो. काही जणांना गुदगुल्यांच्या केवळ कल्पनेनेही हसायला येते. कधी-कधी गुदगुल्या करण्याआधीच हसण्याला सुरवात होते. म्हणजेच या संशोधनातून कळते की आपण स्वतःला कधीच गुदगुल्या करू शकत नाही मात्र इतरांना गंमत म्हणून गुदगुल्या करू शकतो त्यांना हसवू शकतो.