मॉडेलिंग ते अभिनेत्री आणि अभिनेत्री ते मंत्री बनणाऱ्या स्मृती इराणीची सक्सेस स्टोरी खूपच रंजक आहे. स्मृती इराणी सध्या मोदी सरकारमध्ये वस्त्रोद्योग, महिला व बालविकास मंत्रालय सांभाळत आहे. स्मृती इराणीचा जन्मदिवस २३ मार्चला असतो. स्मृती इराणी आपल्या तीन बहिणींमध्ये सर्वात मोठी आहे.

स्मृती इराणीने मिस इंडिया स्पर्धेतही सहभाग घेतला होता. ती १९९८ मध्ये मिस इंडिया विजेतेपदाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाली होती. त्याचवर्षी ती मिका सिंहच्या सावन या अल्बममध्ये लग गई आग या गाण्यामध्ये परफॉर्म करताना पाहायला मिळाली होती. स्मृती इराणी मॉडेलिंगमध्ये येण्यापूर्वी एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करत होती.स्मृती इराणीने टीव्ही सिरीयलमधून आपल्या करियरची सुरवात केली होती. क्योंकि सास भी कभी बहू थी या सिरीयलमधून तिला एक खास ओळख मिळाली आणि बघता बघता ती एक लोकप्रिय अभिनेत्री बनली. तथापि सुरवातीला एकता कपूरच्या टीमने तिला रिजेक्ट केले होते पण एकता कपूरने या सिरीयलसाठी तिची निवड केली. याचा खुलासा स्वतः स्मृती इराणीने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.स्मृती इराणीने यानंतर अनेक सिरीयलमध्ये काम केले. २००१ मध्ये त्यांनी जुबीन इराणीसोबत लग्न केले. स्मृती इराणी जुबीन इराणीची दुसरी पत्नी आहे. जुबीन इराणीचे पहिले लग्न मोनासोबत झाले होते. स्मृतीला दोन मुले आहेत. स्मृती इराणीने २००३ मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि तिने स्वतःला फिल्म इंडस्ट्री पासून दूर केले.